Books, Boards, Clocks & More

At ChessBase India Shop

Visit now!

new books banner

बुद्धिबळ सॉल्व्हिंग: विचार करण्याची कला शिकवणारी स्पर्धा

by रोहित पोळ - 16/10/2026

इचलकरंजीत बुद्धिबळाच्या एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देणारा दुसरा केन बुद्धिबळ सॉल्व्हिंग कप २०२६ सज्ज आहे! केवळ दीड ते अडीच तासांत एकाग्रता, कल्पकता आणि सखोल विचारशक्तीला आव्हान देणारी ही स्पर्धा अनुभवी खेळाडूंसोबतच नवोदितांनाही आपली बुद्धिमत्ता आजमावण्याची संधी देते. कारण बुद्धिबळ म्हणजे केवळ जिंकणं-हरणं नव्हे, तर योग्य पद्धतीने विचार करायला शिकणं!



इचलकरंजी सारख्या शहरात बुद्धिबळ म्हटले की डोळ्यासमोर येते ५ ते ६ तास चालणारी स्पर्धा. पण बुद्धिबळाचे एक असेही रूप आहे जे फक्त दीड (१तास३०मिनिट )ते (२तास३०मिनिट)अडीच तासात तुमची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकते. त्याचे नाव आहे - बुद्धिबळ सॉल्व्हिंग.

गेल्या महिन्यात आम्ही पहिल्यांदा इचलकरंजीमध्ये केन बुद्धिबळ सॉल्व्हिंग कप घेतला. अनेकांना वाटले होते, ही काय नुसती कोडी सोडवायची स्पर्धा? पण स्पर्धा झाल्यावर खेळाडू व पालकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खात्री पटली - इचलकरंजीला आणि पश्चिम महाराष्ट्रला याचीच गरज आहे.शेवटची कोडी सोडवणाऱ्या स्पर्धेतील विजेते रेटेड ग्रुप अनुभवी खेळाडू .अभय भोसले, तन्मय पवार, अथर्व सुतार आणि अथर्व तावरे .अनरेटेड ग्रुप सुबोध जोशी, अर्णव वरुटे

म्हणूनच या महिन्यात आम्ही लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकॅडमी यांच्या वतीने, चेसबेस इंडिया आणि WFCC यांच्या सहकार्याने दुसरा केन बुद्धिबळ सॉल्व्हिंग कप २०२६ आयोजित करत आहोत.

बुद्धिबळ सॉल्व्हिंग म्हणजे काय?

सामान्य बुद्धिबळात समोर प्रतिस्पर्धी असतो. सॉल्व्हिंगमध्ये समोर असते एक रचना. तुम्हाला दिलेल्या पटावरून दोन चालीत मात (#२), तीन चालीत मात (#३) किंवा अभ्यासपूर्ण स्थिती (Endgame Study) सोडवायची असते. येथे घाई करून चालत नाही. एकच योग्य चालीची मालिका शोधावी लागते.

आमची C-C-C पद्धत - Check, Candidate, Calculate - याच स्पर्धेसाठी तयार झाली आहे. मूल रोज क्लासमध्ये हीच सवय लावते आणि स्पर्धेत त्याचा उपयोग करते.

यावर्षीची स्पर्धा दोन गटात:

आम्ही मुद्दाम दोन गट केले आहेत.

१. अनुभवी गट: ज्यांना स्पर्धेचा अनुभव आहे. १० रचना, १५० मिनिटे.

२. नवोदित व १२ वर्षांखालील गट: ज्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे. ६ रचना, ९० मिनिटे.

याचे कारण एकच - प्रत्येकाला वाटले पाहिजे की मी हे करू शकतो. नवोदित मुलाने थेट अनुभवी लोकांच्या गटात बसले तर तो घाबरेल. आम्हाला घाबरवायचे नाही, घडवायचे आहे.

फक्त बक्षीस नाही, विचारांची शिदोरी:

WFCC च्या अनुदानातून आम्ही एकूण ९,००० रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत. पण माझ्या मते सर्वात मोठे बक्षीस हे आहे - ही स्पर्धा खेळल्यावर मूल घरी जाऊन विचार करते, "मी ९० मिनिटे एकाच जागी बसून इतका खोल विचार करू शकतो?" हा आत्मविश्वास त्याला शाळेच्या अभ्यासातही मदत करतो.

म्हणूनच आम्ही १८ ऑक्टोबरला मोफत वेबिनार ठेवला आहे. स्पर्धा म्हणजे काय, कसे सोडवायचे, हे आम्ही आधीच शिकवणार आहोत. स्पर्धा झाल्यावर २१ ऑक्टोबरला आम्ही सर्व उत्तरे समजावून सांगणार आहोत.

बुद्धिबळ म्हणजे फक्त जिंकणे-हरणे नाही. बुद्धिबळ म्हणजे योग्य पद्धतीने विचार करायला शिकणे. आणि तीच शिकवण देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.

स्थळ: कै. बाळासाहेब दाते लायन्स ब्लड बँक, इचलकरंजी | दिनांक: २० ऑक्टोबर, दुपारी ३:३० वा.

संपर्क: ९६५७३३३९२६


लेखक हे केन चेस अकॅडमीचे संस्थापक असून FIDE Development Instructor आणि वरिष्ठ राष्ट्रीय पंच आहेत.रौप्य पदक विजेता महाराष्ट्र राज्य शालेय संघाचे सलग ३ वर्षे प्रशिक्षक होते






Contact Us